सिंधुदुर्ग, मालवण सहल २०२३
दिनांक ६ आणि ७ मार्च २०२३
कन्या महाविद्यालय मिरज येथील वाणिज्य विभागातर्फे पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थीनींसाठी दिनांक ६ आणि ७ मार्च २०२३ रोजी २ दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६ वाजता ४७ विद्यार्थिनीं आणि ३ प्राध्यापकांसमवेत बस महाविद्यालयातून प्रस्थान झाली आणि प्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्र, राधानगरी येथे महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करून सहलीची सुरुवात झाली. त्यानंतर राधानगरी येथील धरणास भेट दिली आणि तलावाचे विहंगमय दृश्य पाहून पुढच्या प्रवासास सुरुवात केली. राधानगरी आणि फोंडा घाट सर करताना अनेक मनमोहक दृश्यांना आठवणीत आणि कॅमेरात कैद करत पुढे जात होतो. काही वेळाने समुद्र किनारी असणाऱ्या कुणकेश्वर मंदिरास भेट दिली आणि तेथेच भक्तनिवास मध्ये सर्वांनी सोबत आणलेल्या शिदोरीचा आस्वाद घेतला. काही वेळ तिथे थांबून आम्ही मालवण ला जाण्यास मार्गस्थ झालो.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्र, राधानगरी
राधानगरी धरण आणि तलावाचे दृश्य
कुणकेश्वर मंदिर येथे काही विद्यार्थिनींचा ग्रुप फोटो
संध्याकाळी मालवण मध्ये पोहोचल्यानंतर सर्वांनी चिवला बीच आणि रॉक गार्डन येथे अथांग समुद्र आणि सुंदर सूर्यास्ताचा अनुभव घेतला. अनेक विद्यार्थिनींनी सूर्यास्त वेळेचे आणि चिवला बीच वरचे अनेक क्षण कॅमेरात टिपून घेतले. याच दिवशी होळी हा सण असल्याने समुद्रकिनारी आयोजित छोटेखानी पारंपरिक होळी पाहण्याची संधी सुद्धा सर्वांना भेटली.
रॉक गार्डन येथे काही विद्यार्थिनींचा ग्रुप फोटो
चिवला बीच येथे आनंद लुटताना विद्यार्थीनी
चिवला बीच येथील सूर्यास्त आणि होळी
सहलीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून व चहापान करून सर्वानी सिंधुदुर्ग या जलदुर्गाला भेट देण्यास आगेकूच केली. सर्वजण एका मोठ्या नावेतून साधारण १५ ते २० मिनिटांचा प्रवास करून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दरवाज्याजवळ पोहोचलो. सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्यता, किल्ल्यावरून दिसणारे अनेक सुंदर नजारे सर्व विद्यार्थिनींनी अनुभवले. याच बरोबर शक्य होईल तितका किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न हि केला. छत्रपती शिवरायांच्या घोषणा सर्वांना एक उत्स्फूर्ती आणि प्रेरणा देणाऱ्या ठरल्या. किल्ल्यावरील भटकंती उरकून पुन्हा नावेने प्रवास करीत किनारी आलो आणि तारकर्ली चौपाटी वर सर्व विद्यार्थिनींनी मनसोक्त आनंद लोटला. किनाऱ्यावरील वाऱ्याची मजा घेत समुद्रातील किंचित शांत अश्या लाटांसोबत मुलींनी मस्त धमाल केली. यानंतर सर्वांनी मस्त मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला आणि परतीच्या प्रवासास सुरुवात केली. परतीच्या प्रवासाच्या वेळेस आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या मंदिरास भेट दिली. अनेक मोहक नजारे पाहत परतीच्या प्रवास शांत आणि सुखदायी पार पडला.
नावेतून जाताना सिंधुदुर्ग किल्ल्याचे दिसणारे विहंगमय
दृश्य
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील विद्यार्थिनींचे काही फोटो
अशी हि दोन दिवसीय सहल अनेक गोड, सुंदर आठवणी सोबत घेऊन यशस्वीरीत्या पार पडली.